Friday, August 31, 2012

Population of Sindhudurg District in 2011

सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या २०११

सन २०११ सालच्या शिरगणतीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या ८,४८,८६८ आहे, या लोकसंख्येत ४,१६,६९५ पुरुष असून ४,३२,१७३  महिला आहेत. ही संख्या महाराष्ट्राच्या लोकसंखेच्या ०.७६ टक्के आहे. सन २००१ च्या शिरगणतीच्या तुलनेत तिच्यात २.३० टक्के घट झाली आहे. या जिल्ह्यात लोकासंख्येची घनता सन २०११ मध्ये दर चौ. कि. मी . ला १६३ आहे. सन २००१ च्या वेळी ती १६७ होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षितांची  संख्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षितांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ८६.५४ टक्के आहे, जी सन २००१ मध्ये ८०.३० टक्के होती. त्यात पुरुषांची टक्केवारी ९३.६८ असून महिलांची ८०.३० आहे. सन २००१ मध्ये ती अनुक्रमे ९०.२६ व ७९.७३ होती. सन २०११ मध्ये ६,७५,२१८ लोक सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षित होते. त्यापैकी पुरुष व महिला अनुक्रमे ३,५६,७१९ व ३,१८,४९९ आहेत. सन २००१ मध्ये शिक्षितांची संख्या ६,१२,९१९ होती.

सिंधुदुर्ग जिल्हा पुरुष-स्त्री गुणोत्तर प्रमाण

भारताचे राष्ट्रीय पुरुष-स्त्री गुणोत्तर प्रमाण सन २०११ च्या शिरगणतीनुसार दर १००० पुरूषामागे ९४० असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र ते दर हजारी १०३७ आहे. सन २००१ मध्ये ते १०७९ होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बालकांची संख्या

सन २०११ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ वर्षापर्यंतच्या बालकांची संख्या  ६८,६३७ आहे. तर ती सन २००१ मध्ये १,०५,५१८ होती. यातील मुलगा-मुलगी प्रमाण ३५,९३० व ३२,७०७ आहे. सन २०११ मध्ये दर हजारी  मुलामध्ये ९१० आहे. तर ते सन २००१ मध्ये ९४४ होते. ६ वर्षापर्यंतच्या बालकांची टक्केवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या ८.०९ टक्के होती. तर ती सन २००१ मध्ये १२.१४ टक्के होती. मागच्या गणतीच्या तुलनेत बालकांची संख्या ४.०५ टक्क्यांनी घटली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी लोकवस्ती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण व शहरी लोकवस्तीचे प्रमाण अनुक्रमे ८७.४० व १२.६० आहे. प्रत्यक्ष लोकसंख्या अनुक्रमे ७,४१,८७० व १,०६,९९८ आहे. स्त्री-पुरुष प्रमाण ग्रामीण भागात ३,६२,६८१ व ३,७९,१८९ असून ते शहरी भागात अनुक्रमे ५४,१०४ व ५२,९८४ आहे. ग्रामीण भागात पुरुष-स्त्री गुणोत्तर प्रमाण १०४६ असून शहरी भागात ते ८९४ आहे. ग्रामीण भागात बालकांची संख्या ५९,४७१ असून मुलामुलींचे प्रमाण ३१,०९० व २८,३८१ आहे. तर शहरी भागात ते ९,१६६ व त्यात मुला-मुलींची संख्या अनुक्रमे ४,८४० व ४,३२६ आहे. ग्रामीण शिक्षितांचे प्रमाण ८५.५८टक्के  असून त्यात पुरुष-स्त्री  प्रमाण ९३.३३ व ७८.२५ आहे. प्रत्यक्षात ५,८३,९९२ लोक शिक्षित होते. त्यात पुरुष व स्त्रियांचे प्रमाण अनुक्रमे ३,९०,४७० व २,७४,५२२ आहे. शहरी भागात शिक्षितांचे प्रमाण  ९३.२५ टक्के आहे. त्यात पुरुष व स्त्रियांचे प्रमाण अनुक्रमे ९६.०९ व ९०.३८ टक्के आहे. शहरी भागात प्रत्यक्षात शिक्षित लोक ९१,२२६ असून त्यात पुरुष व स्त्रियांचे प्रमाण ४७,२४९ व ४३,९७७ आहे.

Monday, August 27, 2012

Sindhudurg District Location

महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्थान




सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नकाशा          



















सिंधुदुर्ग जिल्हा

या जिल्ह्याची स्थापना रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून १ मे १९८१ रोजी झाली. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा असून तो कोकण विभागात आहे. त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र असून पूर्वेस सांगली व कोल्हापूर  जिल्हे  आहेत. दक्षिणेस गोवा हे राज्य असून उत्तरेस रत्नागिरी जिल्हा आहे. कोकणातील हा सर्वात  दक्षिणेकडील जिल्हा आहे.

जिल्ह्यात सावंतवाडी,  कणकवली, कुडाळ, देवगड, दोडामार्ग, मालवण, वेंगुर्ला व वैभववाडी हे ८ तालुके आहेत. या जिल्ह्याच्या खास बोलीभाषा मालवणी व कुडाळी  आहेत.

या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,२०७ चौ. किलोमीटर असून लोकसंख्या सन २०११ च्या शिरगणतीनुसार ८,४८,८६८ आहे. येथील पर्जन्यमान सुमारे ३२८७ मी. मी. आहे.

राजापूर हा एकमेव लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी व सिंधुदुर्ग मध्ये विभागला असून येथून श्री निलेश नारायण राणे हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. येथे श्री विरेंद्रसिंग हे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या जिल्ह्यात सावंतवाडी, कणकवली व कुडाळ हे विधानसभा मतदारसंघ आहेत. या जिल्ह्याचे पालकमंत्री मा . ना . श्री नारायणराव राणे आहेत.

हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे. जिल्ह्याचा संपूर्ण परिसर हिरव्यागार वनश्रीने नटला असून नारळ, पोफळी व आंबे, काजूच्या बागा एकूण प्रदेशाला शोभा आणीत आहेत. पश्चिम किनारपट्टीला निळाशार समुद्र असून किनारपट्टी चंदेरी वाळूने  सजली आहे. पूर्वेला चढता भूभाग असून त्याला वलाटी   म्हणतात, तेथील सह्याद्री पर्वताच्या रांगा निसर्ग भ्रमंतीला साद घालतात.

ह्या जिल्ह्यात १७ क्रमांकाचा राजमार्ग मुंबई-गोवा महामार्ग म्हणून प्रसिद्ध असून मुंबई व  गोवा या जिल्ह्यातून जोडले गेले आहेत. कोकण रेल्वे या जिल्ह्यातून जात असून कणकवली, कुडाळ, ओरोस, सावंतवाडी ही महत्वाची ठिकाणे रेल्वेद्वारे जोडली गेली आहेत.